रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे धोक्यात आले मार्कंडादेव मंदिर

164

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली,ता.१६: विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील मंदिर परिसरालगतच्या रस्त्यावरुन ओव्हरलोड रेती भरलेले ट्रक मार्गक्रमण करीत असल्याने मार्कंडेश्वर मंदिर समुहाला धोका निर्माण झाला आहे.

मोहुर्ली येथील रेती घाटातून रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. सुरुवातीला रामाळा, घारगाव व मोहुर्ली या गावांमधून ही वाहतूक केली जात होती. मात्र, अपघाताची भीती आणि प्रदूषणामुळे गावकऱ्यांनी गावातून होणारी वाहतूक बंद केली. त्यामुळे ही वाहतूक मार्कंडादेव गावातील रस्त्याने सुरु करण्यात आली आहे. दररोज या मार्गाने ओव्हरलोड रेती भरलेले मोठमोठे ट्रक मार्गक्रमण करीत आहेत. याच परिसरात सुरेख असा मार्कंडेश्वर मंदिर समूह आहे. परंतु ओव्हरलोड ट्रकमुळे कंपन निर्माण होत असून, मंदिराला तडे जाण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच या मंदिराच्या काही मूर्तींची नैसर्गिक आपत्तीमुळे मोडतोड झाली आहे. त्यातच आता ट्रकमुळे पुन्हा मंदिराला धोका निर्माण झाला आहे. शिवाय अपघाताची भीती आणि रेतीमुळे होणारे प्रदूषण यामुळे नागरिकांना रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी अमित रंजन व तहसीलदार प्रशांत घारुडे यांना रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी केली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

——————————