ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २३ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे नागरिक देशविकासाचे भागीदार होतील व प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी यात असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस भाजप उद्योग आघाडीचे सी.ए. समीर बाकरे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने शासकीय विश्रामगृहात रविवार २३ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परीषदेत बाकरे यांनी अर्थसंकल्प २०२५ चे विश्लेषण करत आपले मत व्यक्त केले. या पत्रकार परीषदेला माजी खासदार तथा भाजप अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कोहळे, महामंत्री प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. पत्रकार परीषदेत समीर बाकरे म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील. शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवाशिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करप्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत माजी खासदार अशोक नेते यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती दिली.










