अहेरी सुपर किंग्सची चौथ्या उपांत्य फेरीत ७ विकेट्सने बाजी

123

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २६ : गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग २०२५ अंतर्गत चौथ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अहेरी सुपर किंग्सने दमदार खेळ करत आरमोरी स्टार हिटर्सवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. एमआयडीसी गडचिरोली मैदानावर खेळल्या गेलेल्या या थरारक सामन्यात नाणेफेक जिंकत अहेरी सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरमोरी स्टार हिटर्सने २०षटकांत ८ गडी गमावत १२९ धावा केल्या. त्यामध्ये प्रकाश सरकारने २७ चेंडूत ३३ धावा आणि आलोक सहारेने २४ चेंडूत २४ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. अहेरी सुपर किंग्सकडून गोलंदाजीत अजय मित्तेवार (४ षटकांत १९ धावा, २ विकेट्स), राहुल राठोड (३ षटकांत २८ धावा, २ विकेट्स) आणि शुभम सल्लान (४ षटकांत १७ धावा, २ विकेट्स) यांनी अप्रतिम मारा करत आरमोरीच्या फलंदाजांना जखडून ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना अहेरी सुपर किंग्सने अत्यंत संतुलित खेळी केली. राहुल राठोडने नाबाद ५८ धावा (४७ चेंडूत) खेचत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर महेश नैनवारने २२ चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी केली. १८.३ षटकांत ३ गडी गमावत १३० धावा पूर्ण करत अहेरी सुपर किंग्सने हा सामना सहज जिंकला. आरमोरी स्टार हिटर्सकडून गोलंदाजीत गोविंदाने ४ षटकांत १५ धावा देत २ विकेट्स घेतले, तर शुभाष भुरेने ४ षटकांत २८ धावा देत १ विकेट् मिळवली. या सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार राहुल राठोड याला प्रदान करण्यात आला. त्याने ५८ धावा काढण्यासोबत ३ षटकांत २८ धावा देत २ विकेट्स मिळवले. सामना गमावलेल्या आरमोरी स्टार हिटर्स संघाला सन्मानचिन्ह व १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या या रोमांचक टप्प्यात अहेरी सुपर किंग्सने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला असून आगामी सामने आणखी चुरशीचे ठरणार आहेत.