वैनगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू, दोघे वाचले

296

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली), ता. २६ : महाशिवरात्री यात्रेनिमित्त आलेले ३ युवक वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेले असता नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले . ही घटना बुधवार (ता. २६) दुपारी १२.३० दरम्यान घडली .

प्राप्त माहितीनुसार अभिषेक संतोष मेश्राम (वय २४), जितू राजेश्वर दुर्गे (वय २०), खुशाल सुखराम सोनवने (वय १८) हे तिघेही रा. महाकाली वाॅर्ड, लक्ष्मी बजाज शोरूम समोर चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. हे तिन्ही युवक चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला आले होते. ते आंघोळीला राखीव क्षेत्र असलेल्या भागात आंघोळ न करता दुसऱ्या बाजूला आंघोळीला गेले. परंतु त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यात अभिषेक मेश्राम याचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर इतर लोकांच्या प्रयत्नांमुळे दोन युवकांना वाचविण्यात यश आले. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल कातबाने आणि इतर पोलिस पथकांनी घटनास्थळी जात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.