लोक नृत्य भारत भारती’ महोत्सव आजपासून प्रारंभ

168

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोक नृत्य भारत भारती’ महोत्सवाचे स्थानिक विद्याभारती कन्या हायस्कूल येथे १ ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज संध्याकाळी ६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती व लोककला पूनर्जीवित करण्यासाठी तसेच नव्या पिढीला याची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन संयुक्तपणे प्रयत्नशील आहेत. या तीनदिवसीय महोत्सवामध्ये भारताच्या विविध राज्यांतील लोकनृत्यांच्या रंगारंग सादरीकरणांचा मनमोहक कार्यक्रम होणार आहे. लावणी, कोळी नृत्य, मध्य प्रदेशातील बधाई, नोरता नृत्य, राजस्थानातील रंगीला कालबेलिया, भवई, चरी नृत्य, हरियाणाती घूमर, फाग नृत्य, गुजरातचे सिद्धी धमाल नृत्य, ओडिशातील सांबलपुरी / दालखाई नृत्य सादर होणार आहे. या महोत्सवासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर-गोडबोले व सांस्कृतीक कार्य मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.