तरुणीला मारहाण करून अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ

248

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता.३ : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एका गावात शौचास गेलेल्या तरुणीवर मारहाण करून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तालुक्यातील शिवणी गावात रविवार (ता. २) रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. जखमी तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी मार्गावरील वाकडीनजीकच्या शिवणी गावातील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली २३ वर्षीय तरुणी रविवारी सायंकाळी ६ वाजता शौचासाठी गावालगतच्या परीसरात गेली होती. तासाभरानंतरही ती परत न आल्याने कुटुंबीयाने शोध घेतला असता शौचास गेलेल्या ठिकाणापासून २० मीटर अंतरावर ती बेशुध्दावस्थेत आढळली. तिच्या हाताला जखम होती. शिवाय डोळ्याखाली दगड किंवा विटाने मारहाण केल्याचे व्रण होते. दरम्यान, ग्रामस्थांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. जखमी तरुणीवर उपचार सुरु असल्याने जबाब नोंदविण्यास उशीर होत असून त्यानंतरच प्रकरणांची सत्यता पुढे येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांकडून वेगाने तपास सुरु करण्यात आला आहे. तरुणीवर हल्ला करणारा आरोपी एक की त्याहून जास्त याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे. हल्लेखोर गावातीलच असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यादृष्टीने तपासचक्रे गतिमान केली आहेत. तरुणीवर हल्ला करणाऱ्याचा शोध सुरु आहे. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला किंवा नाही हे तिच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली असून कुठल्याही स्थितीत लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.