विविध राज्यांतील लोकनृत्यांनी जिंकली रसिकांची मने

209

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता. ४ : विविधतेत एकता हे आपल्या भारत देशाचे आगळे वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय ‘लोकनृत्य भारत भारती’ या महोत्सवात दिसून आले. या महोत्सवात सादर झालेल्या सात राज्यांतील अस्सल भारतीयत्वाचा सुगंध असलेल्या गीत, नृत्यांनी देशातील अद्भूत लोक संस्कृतीचे दर्शन घडले.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार (ता. १) झाले. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार (ता. २) महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, ओडीशा, हरीयाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात या सात राज्यांतील कलावंतांनी लोकनृत्य सादर केले. स्थानिक विद्याभारती कन्या हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी. संस्थाध्यक्ष तथा प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुजरा लावणी, गोंधळ आणि कोळी नृत्याने झाले. दिलखेचक अदाकारीने नटलेली लावणी, उदो ग अंबे उदो म्हणत आई तुळजाभवानीसाठी घालतलेला जागर, गोंधळ आणि दर्या किनारी असलेल्या कोकणच्या समृ्द्ध संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कोळी नृत्याने झाली. या तिन्ही नृत्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावत कार्यक्रमात विलक्षण उर्जा पेरली. त्यानंतर डोक्यावर अनेक भांडे ठेवून नृत्य करत, साहसी कला प्रकारांनी अचंभित करणारे खास भवाई लोकनृत्य सादर झाले. या नृत्यात कलाकारांनी डोक्यावरचा भांड्यांचा तोल सांभाळत खाली ठेवलेली नोट तोंडाने उचलणे, काचेच्या ग्लासवर उभे होणे, स्टिलच्या ताटावर उभे होऊन गोल फिरणे अशा अनेक चित्त थरारक कसरती सादर केल्या. छत्तीसगडच्या रंगीतसंगीत सुवा नृत्या आणि राऊत नाचा नृत्याने कार्यक्रम अधिकच बहारदार केला. ओडीशातील कलाकारांनी सुमधुर आवाजात गात आणि विलक्षण गतिमान हालचालींचे पारंपरिक बजनिया नृत्य करत उपस्थितांची दाद मिळवली. हरीयाणा राज्यातील कलावंतांनी अतिशय जलद हालचाली आणि तालबद्ध पदन्यासांचे घुमर नृत्य सादर करत लोकरंजन केले. डोक्यावर गौरीप्रमाणे रोपांची कुंडी घेऊन गात, नाचत मध्य प्रदेशच्या कलावंतांनी त्यांच्या राज्यातील जवारा हे खास नृत्य सादर केले. सर्वाधिक धमाल गुजरात राज्यातील सिद्दी धमाल या लोकनृत्याने आणली. सिद्दी धमाल हा पूर्व आफ्रिकेशी सांस्कृतिक संबंध असलेल्या सिद्दी लोकांकडून सादर केला जाणारा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मिलिंद उमरे यांनी केले. या नृत्यात कलाकारांसोबत उपस्थित रसिकांनीही गात, नाचत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला गडचिरोलीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची संकल्पना….

हा कार्यक्रम संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या नियोजनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. भारतातील विविध संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.