Home Gadchiroli कुस्करत होता कोवळ्या कळ्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कुस्करत होता कोवळ्या कळ्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

119

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील चाळे करत कोवळ्या कळ्या कुस्करण्याचे पाप करणा­ऱ्या मुख्याध्यापकास गडचिरोली पोलिसांनी बेड्या घातल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत मागील काही दिवसांपासून शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात होते. पालकांच्या समजदारीमुळे आणि बालिकांच्या वागण्यामध्ये दिसून आलेले बदल व भिती पालकांनी हेरल्यामुळे ही भयंकर घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकाच कुटुंबांतील दोन पीडित बालिका शाळेत जाण्याची तयारी करत असताना शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या व शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी या अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालिकांनी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळ्या वेळी शाळेतील ऑफिसमध्ये रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने बोलावून इतर कोणीही नसताना त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असतात व या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात, असे सांगितले. पालकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच शाळेमध्ये शिकणा­ऱ्या इतर बालिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसमक्ष बालिकांकडे चौकशी केली असता मुख्याध्यापक रवींद्र उगव्हारे याने काही इतर मुलींसोबतदेखील याच प्रकारचे अश्लील कृत्य केले असल्याचे त्या बालिकांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी उपविभाग भामरागडअंतर्गत लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे जाऊन बुधवार (ता.५) तोंडी तक्रार दिली होती. यावरून लाहेरी पोलिसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळsचा मुख्याध्यापक रवींद्र उष्टूजी गव्हारे ( वय ४५) रा. ता. भामरागड, जि. गडचिरोली याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करून गुरुवार (ता. ६) त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, भामरागड येथील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे. या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी गडचिरोली पोलिस दल प्रयत्नशील राहील, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.