अतिदुर्गम भागांत नागरी कृती कार्यक्रमांचे आयोजन

118

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : सुरक्षा दल नक्षलग्रस्त भागात नवीन सुरक्षा छावण्या उभारून त्यांचे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. याच अनुषंगाने अतिदुर्गम भागांतील गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दल नागरी कृती कार्यक्रमदेखील राबवत आहे.

आदिवासीबहुल, अत्यंत दुर्गम आणि अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या १९२ व्या बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक कमांडंट महेश चंद मीना यांच्या नेतृत्वात नागरी कृती कार्यक्रमाअंतर्गत जारावंडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील आदिवासी, गरजू आणि गरीब ग्रामस्थांना भांडी, कढई, कुदळ, टॉर्च लाईट, कृषी पंप सेट, व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉल नेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जारावंडी गावाच्या सरपंच सपना कोडापे, उपसरपंच सुधाकर टेकाम, ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामस्थ आणि जारावंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी तेजस मोहिते, पोलिस उपनिरीक्षक रोशन ओकाटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरक्षा दलाच्या सैनिकांनी आवश्यक साहित्य देण्यासोबतच गावकऱ्यांशी संवादसुद्धा साधला.