पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य नष्ट करून पोलिसांनी उधळला घातपाताचा कट

228

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १५ : जिल्ह्यात माओवाद्यांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य सुरक्षा दलांना हानी पोहचविण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवले जाते. अशा पुरॉून ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताहदरम्यान तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलिस दलाने अशाच प्रकारचा माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावत त्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य नष्ट केले आहे.

शनिवार (ता. १५) भामरागड उपविभागआअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस स्टेशन येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोलिस स्टेशनपासून दक्षिणेला अंदाजे १०० मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बीडीडीएस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे या जंगल परिसरात शोध अभियान सुरू करण्यात आले. यावेळी भरमार बंदूक लपविलेल्या झुडपांशेजारी एक संशयित जागा दिसल्याने या घटनास्थळाची पाहणी केली असता जमिनीमध्ये अंदाजे दीड ते दोन फुट खोलावर डेटोनेटरसाठी वापरण्यात येणा­या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टीकची पिशवी आढळली. या पिशवीची बीडीडीएस पथकाकडून एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक तसेच भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी पार पाडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे. तसेच या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.