ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २७ : अहेरी येथे तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने व चपलेने क्रूरपणे मारहाण केली. चार ते पाच विद्यार्थ्यांनी याबाबत नातेवाईकांना कळविल्यानंतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार (ता. २७) एकलव्य स्कूलमध्ये धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य मॉडेल निवासी स्कूल चालविले जातात. यानुसार अहेरीत देखील हे स्कूल असून तेथे सातशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान, २५ मार्च रोजी दुपारी जेवणानंतर काही मुले आपल्या खोलीत जाऊन झोपली होती. यावेळी वसतिगृह अधीक्षक ईश्वर शेवाळे याने त्यांना काठीने व चपलेने मारहाण केली. यानंतर एका विद्यार्थ्यास अभ्यास करताना स्टडी रूममध्ये झोप लागली. त्याला देखील चप्पल व काठीचा मार देण्यात आला, अशा आशयाच्या तक्रारीने एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा कसा छळ सुरु होता, हे समोर आले आहे. यांसदर्भात अहेरीचे उपविभागीय अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना संपर्क केला त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नागेश मडावी व इतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकलव्य स्कूलमध्ये सुरू असलेल्या अधीक्षकाच्या मनमानीचा पाढा वाचून दाखविला. अधीक्षक ईश्वर शेवाळे याच्यावर गुन्हा नोंदवून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधीक्षक ईश्वर शेवाळे हा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करत होता. मात्र, त्याच्या दहशतीमुळे विद्यार्थी कुठे याबाबत कुठेच वाच्यता करत नव्हते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पायावर केलेल्या मारहाणीचे फोटो समाजमाध्यमात प्रसारित झाले, त्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला.अहेरी येथील एकलव्य माॅडेल निवासी शाळेत मुलांच्या वसतिगृहाचा अधीक्षक ईश्वर शेळके याने कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याची माहिती मिळताच माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम एकलव्य शाळेत धडकले. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपबिती ऐकली. त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना हिंमत दिली.असले अमानुष प्रकार पुन्हा घडू नये, असे प्राचार्यांना खडसावून सांगीतले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची भेट घेऊन अधीक्षक शेवाळेला सर्वप्रथम तत्काळ बडतर्फ करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.










