Home Gadchiroli नक्षलवाद्यांनी गळा दाबून केली ग्रामस्थाची हत्या

नक्षलवाद्यांनी गळा दाबून केली ग्रामस्थाची हत्या

217

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३० : भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी एका निरपराध आदिवासी वृद्धाची शनिवार (ता. २९)मध्यरात्री गळा दाबून हत्या केली. रविवार (ता. ३०) गुढीपाडव्याच्या सकाळी ही घटना उजेडात आली. पुसू गिबा पुंगाटी (वय ६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन महिन्यांत नक्षलवाद्यांनी दोन हत्या केल्याने भामरागडमध्ये पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पुसू पुंगाटी कुटुंबासह घरी होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी घराच्या दरवाजावर थाप मारली. कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता पुसू पुंगाटी यांच्याकडे काम आहे, असे सांगून त्यांना ते सोबत घेऊन गेले. गावालगतच्या जंगलात पुसू पुंगाटी यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे घटनास्थळी नक्षलवाद्यांचे कुठलेच पत्रक किंवा पोस्टर आढळून आले नाही. त्यांचा मृतदेह भामरागड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ते खबरी असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.