मुरमुऱ्याच्या पोत्याखाली दारू लपवून नेणारा आरोपी अटकेत

148

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही एका दारूतस्कराने गाडीत वर मुरमुऱ्याचे पोते आणि खाली चक्क दारू ठेवून तस्करीचा प्रयत्न केला.पण पोलिसांनी त्याला अटक केली. धम्मत गुणवंत बोरकर (वय २४), रा. गिधाडी, ता. गोरेगाव जि. गोंदिया, असे आरोपीचे नाव असून १२ एप्रिल २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या छुप्या रीतीने दारूविक्री व वाहतूक केली जाते. त्याविरुद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये पोलिस दारूतस्करीचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या प्रयत्नात असतात. शनिवार (ता. १२)पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पीकअप या चारचाकी वाहनाने देवरी ते कोरची मार्गाने अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक शैंलेद्र ठाकरे व त्यांचे एक पथक या ठिकाणी रवाना करण्यात आले. या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार पकनाभट्टी- जांभळीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला सापळा रचून बसले होते. सकाळी ६:४० वाजता दरम्यान एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन चालकास हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. त्याने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यानंतर त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव धम्मत गुणवंत बोरकर, रा. गिधाडी ता. गोरेगाव जि. गोंदिया असे सांगितले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मुरमुऱ्याच्या पोत्याखाली दारू लपवून ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी धम्मत बोरकरच्या वाहनाची कसून तपासणी केली तेव्हा वाहनाच्या मागील ट्रॉलीत असलेल्या मुरमु­ऱ्यांच्या पोत्याखाली ८० – खर्ड्याच्या बॉक्समध्ये गोवा विस्की, 10 खर्ड्याच्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीची दारू, ७ खर्ड्याच्या बॉक्समध्येबियर बॉटल,३ खर्ड्याच्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीची दारून अशी एकूण ९ लाख ९७ हजारांची दारू, ४००० रुपये किंमतीचे मुरमुऱ्यांचे पोते व वाहतुकीकरिता वापरलेले चारचाकी क्र. सी जी ०८ ए. के. ८४५३ दाजे किंमत ६ लाख रुपये असा एकूण १६ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. या प्रकरणी धम्मत बोरकर व फरार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी बोरकरला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरचीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक शैंलेद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, पोलिस हवालदार राकेश मेश्राम, पोलिस अंमलदार दिनेश कुवर, इंसाराम ताराम आदींनी केली.