ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली.ता. ७ : अनेक मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती काळापासूनच कमतरता असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मिळणार आहे. त्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉयड मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार झाले आहेत. यातून ही नवी तंत्र व शिक्षण क्रांती घडणार आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉयड मेटल्स एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करारांचे राजभवनात बुधवार (ता. ७) आदानप्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरू मार्क ऑग्डन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे संविधानिक अधिकारी व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठ व लॉयड मेटल्स यांच्यात गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयांतील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत करार करण्यात आला. तसेच गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यामध्ये जुळे कार्यक्रम (ट्विनिंग डिग्री) आयोजित करण्याबाबत करार करण्यात आला. याचे सकारात्मक व दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आजपर्यंत समस्यांच्या गर्तेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला या करारामुळे विकासाची नवी दिशा मिळून जिल्ह्याची चौफेर प्रगती होईल तसेच जिल्हावासीयांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.










