झिंगानूर येथे दारू, चारचाकी वाहनासह २० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २२ : पोलिसांनी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे गुरुवार (ता. २१) कारवाई करत अवैध दारू, चारचाकी वाहनासह २० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे राहणारा कारे कोरके गावडे ( वय ३८)याने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने दारू घरात साठवून ठेवलेली आहे , अशी माहिती पोलिसांना मिळाली. सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व झिंगानूर उप पोलिस स्टेशन यांचे संयुक्त पोलिस पथक झिंगानूर येथे रवाना करण्यात आले. कारे गावडेच्या घरी पोहचून पोलिस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरात ९० एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे १२४ खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकूण १२ हजार ४०० नग सीलबंद बॉटल, प्रती बॉक्स किंमत १० हजार रुपये प्रमाणे एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्यानंतर पोलिसांनी कारे गावडेकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्याने ही देशी दारू समया बापू दुर्गम ( वय ३२) व सडवली बापू दुर्गम ( वय ३२) दोघेही रा. झिंगानूर यांची असून त्यांच्या घरीसुद्धा विक्रीकरिता अवैधरित्या देशी दारूची साठवणूक करून ठेवली असल्याचे सांगितले. पोलिस समया बापू दुर्गम व सडवली बापू दुर्गम यांच्या घरी गेले असता पोलिस पथक आल्याचा सुगावा लागल्याने दोघेही आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांनी त्यांच्या घराच्या अंगाणामध्ये उभे असलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो वाहन क्र. ए.पी-१५-एम-१०८८ या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ९० एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे ४८ खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकूण ४ हजार ८०० नग सीलबंद बॉटल, एकूण ४ लाख ८० हबजार रुपये व एक चारचाकी वाहन महिंद्रा बोलेरो अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ८ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी कारे गावडेची अधिक कसून चौकशी केली असता, त्याने ही देशी दारू रुपेश कांरेगला (वय ३२) रा. देचलीपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली हा पुरवठा करत असल्याचे सांगितले. चारचाकी वाहनासह दोन्ही ठिकाणांवरून आढळलेला एकूण २० लाख ७० हजार रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. आरोपी कारे कोरके गावड ( वय ३८), समया बापू दुर्गम ( वय ३२), सडवली बापू दुर्गम ( वय ३२) तिघेही रा. झिंगानूर व रुपेश कांरेगला ( वय ३२) रा. देचलीपेठा ता. अहेरी, जि. गडचिरोली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारे गावडे याला अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे करत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात झिंगानूरचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे, सहायक फौजदार नरेंद्र दुबे, नायक पोलिस अंमलदार सचिन जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस हवालदार राजू चव्हाण, चालक पोलिस हवालदार आनंद खोब्राागडे व पोलिस अंमलदार नईम शेख यांनी पार पाडली.

—————————————–