ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २५ : आतापर्यंत कधी बोदली, वाकडी, कधी श्री क्षेत्र सेमाना देव परीसरापर्यंत येणारे रानटी हत्ती आता शहरातही येत आहेत. शनिवारी २४ मे रोजी मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास टस्कर सुळेवाले नर हत्ती शहरात दाखल झाल्याने मोठेच संकट निर्माण झाले होते. पण मध्यरात्रीची वेळ असल्याने नागरिक झोपेत होते आणि शहर सुनसान होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.
ओडिशा राज्यातून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप मागील ३ वर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसला आहे. आता हे दोन सुळेवाले नर हत्ती मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात दाखल झाल्याने गडचिरोलीकरांसोबतच वनविभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात धुमाकूळ घालणाऱ्या दोन टस्कर हत्तींनी शनिवारी मध्यरात्री गडचिरोली शहरातील लांजेडा परिसरात प्रवेश केला. त्यानंतर हे हत्ती रामनगर परीसर, रेड्डी गोदाम परीसरातही फिरल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने ही मध्यरात्रीची झोपेची वेळ असल्याने रस्त्यांवर वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठे नुकसान टळले. हत्तींच्या प्रवेशाची माहिती मिळताच पहाटे तीन वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही हत्तींना आमिर्झा जंगलाच्या दिशेने पळवून लावले. या हत्तींची चित्रफित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्याने हत्तींनी शहरात मारलेला फेरफटका चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांनी हत्ती आढळल्यास त्यांचा पाठलाग न करता अथवा फोटो काढण्याचा प्रयत्न न करता वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. विशेषतः रात्रीच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे व सतर्क राहावे, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात नव्यानेच दाखल झालेल्या या दोन सुळेवाल्या हत्तींनी आठवडाभरापूर्वी छत्तीसगडहून गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी सकाळी ६, ३० वाजताच्या सुमारास या हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली होती. हत्तींना घाबरून पळणारी एक महिला उंच जागेवरून कोसळून जखमी झाली होती. आता हेच हत्ती गडचिरोली शहरातही फिरून लागल्याने कोणताही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वनविभागाने या रानटी हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
————————————–










