सिरोंचा-आलापल्ली, कुरखेडा-कोरची मार्ग न वापण्याच्या सूचना

386

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दोन प्रमुख मार्गांवरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. सिरोंचा-आलापल्ली, कुरखेडा-कोरची मार्गाने न जाता पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहने सुरू असून हा रस्ता पावसाळ्यात जड वाहतुकीस पूर्णतः अयोग्य असल्याने हा मार्ग ५ जूनच्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील जड वाहने मंचेरीयाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाचा तसेच आलापल्लीहून मंचेरीयालकडे जाण्यासाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरीयाल या पर्यायी मार्गाचा वापर करतील. मात्र आपत्कालीन, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलिस, अन्न-औषध, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व प्रवासी सेवा वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ नव्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून वळण रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. मात्र पावसाळ्यात हा वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ४ जून २०२५ मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा हे मार्ग वापरण्यात येतील, तर जड वाहनांसाठी कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसीलदार, पोलिस विभाग, परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक फलक इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असून ट्रॅफिक नियमनासाठी पोलिस विभाग आवश्यक मनुष्यबळ व बॅरेकेडींगची व्यवस्था करणार आहे. संबंधित तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी आठवड्याला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. मोटार वाहन कायदा १९८८, भारतीय दंडसंहिता १८६०, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत संबंधितांचे पालन करणे बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार, वाहनचालक तसेच नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

————————–