शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

55

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे एका शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या दोन सख्ख्या मावस भावंडाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (ता. ६) सकाली १० वाजताच्या सुमारास घडली. विहान ज्ञानेश्वर मडावी (वय १२) रा. शिरपूर) व रुदय मडावी (वय ९) रा. गडचिरोली, अशी मृत भावंडांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास विहान आणि रुदय हे दोघेही सुटी असल्याने गावाजवळील शेतात गेले होते. यावेळी शेततळ्यातील पाणी बघून दोघांनाही अंघोळीचा मोह झाला. दरम्यान, तळ्याच्या काठावर सायकल आणि कपडे काढून ठेवत दोघेही पाण्यात उतरले.परिसरात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेततळे पाण्याने तुडूंब भरले होते. त्यामुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. काही वेळानंतर शेतात जाणाऱ्या गावकऱ्यांना काठावर कपडे आणि सायकल दिसली. मात्र कुणीही व्यक्ती त्यांना दिसले नाही. त्यामुळे तळ्याच्या दिशेने पाहणी केली असता दोन लहान मुलांचे मृतदेह तळ्यातील पाण्यावर तरंगताना आढळले. त्यांनी घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना दिली. गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास कुरखेडा पोलिस करत आहेत. मृत विहान मडावी याचे वडील शिक्षक असून तो कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूल येथे सातव्या वर्गात शिकत होता. तर त्याचा मावस भाऊ रूदय हा गडचिरोली येथे शिकत होता. तो पाहूणा म्हणून शिरपूर येथे मावशीकडे आला होता. त्याचे वडील गडचिरोली पोलिस दलात कार्यरत आहेत.

————————————–