आपल्या अल्पवयीन मुलांना दिली दुचाकी; २४ पालकांवर गुन्ह्यांची नोंद झाली पक्की

127

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : अलीकडे अनेकजण आपल्या मुलांचे लाड पुरवताना मोटर वाहन कायदा धाब्यावर बसवत अल्पवयीन असतानाच त्यांच्या हातात वाहनाची चावी देतात. मग ही पौगंडावस्थेतील अल्पवयीन मुले सुसाट सुटतात आणि अपघात होता. असे प्रकार गडचिरोली शहरात सातत्याने वाढत असल्यामुळे अखेर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचा बडगा उगारत धडक मोहीम राबवली आणि या मोहिमेअंतर्गत आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी हन वापरण्यासाठी देणा­ऱ्या २४ पालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शहरातील वाढत्या वाहतूकीच्या वर्दळीमुळे गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी चालवित असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहनचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. २९ जून रोजी अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणा­ऱ्या १४ व ३ जुलै रोजी १० अशा एकून २४ पालकांवर गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्राप्त माहितीनुसार २९ जून व ३ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांमार्फत शहरातील पाच विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान काही अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळले. या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसतानादेखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) अन्वये २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कायद्यान्वये अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते. या कलमानुसार अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा २५ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच अशा अल्पवयीन बालकावर बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार बाल न्याय मंडळासमोर खटलासुद्धा चालवला जाऊ शकतो. या मोहिमेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, या मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनीदेखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतूकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करून द्यावी. ही मोहिम पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुळ राज जी., उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम व गडचिरोली पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.

———————————