विद्यार्थ्यांमधील कर्करोगाबद्दल आदिवासी विकासमंत्री काय म्हणाले माहित आहे का ?

124
Breast cancer, Asian doctor woman with pink ribbon, symbol of World Breast Cancer Day.

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता. १६ : आपला गडचिरोली जिल्हा विद्यार्थ्यांमधील कर्करोगाच्या दिशेने गंभीर वळण घेत आहे. जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील तब्बल ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनीच विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थांवर कर्करोगाची काळी छाया पसरत असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवा १५ जुलै २०२५ रोजी विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी व्यसनाधीन झाल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी लेखी उत्तर दिले. सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, भामरागड आणि अहेरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. मंत्री डॉ. उईके म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांत ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ७ विद्यार्थ्यांवर नागपूर येथे लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भामरागड तालुक्यातील १,७७८ विद्यार्थ्यांपैकी ४८७विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याचे, मात्र त्यांना कोणतेही गंभीर आजार नसल्याचे निष्पन्न झाल्याचेही मंत्री डॉ. उईके यांनी उत्तरात म्हटले आहे. अहेरी प्रकल्पातील २,१६३ विद्यार्थ्यांपैकी १८९ विद्यार्थी व्यसनाधीन असून त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना पूर्व कर्करोगाचे लेझर उपचार करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहितीही आदिवासी विकास मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली. या आकडेवारीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढते व्यसनांचे प्रमाण आणि कर्करोगाची चाहुल या बाबींमुळे वातावरण चिंताग्रस्त झाले आहे.

————————-