चामोर्शी परीरसरात टस्कर हत्तीने घातला हैदोस
चामोर्शी, ता. ६ : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील उत्तर भागात हैदोस घालणारे रानटी हत्ती आता जिल्ह्याच्या इतरही भागांत फिरू लागले असून एका टस्कर हत्तीने चामोर्शी वनक्षेत्रात हैदोस घालत शेतीचे व घरांचे नुकसान केले आहे.
टस्कर हत्तीने चामोर्शी वन उपक्षेत्रात पाच दिवस मुक्काम करत शनिवार (ता. २) रात्री या क्षेत्रातून गडचिरोली वनक्षेत्रात आगेकूच केल्याची माहिती चामोर्शी वनविभागाने दिली होती. पण तो हत्ती पुन्हा सोमवार (ता. ४) चामोर्शी वनपरीक्षेत्रात परतला. त्याने शहरालगतच्या एका शेतकऱ्याच्या शेतात धानपिकाचे व घराचे नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांत व नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टस्कर हत्ती चामोर्शी वनपरिक्षेत्रात जवळपास पाच दिवस मुक्कामाने होते. तो कुनघाडा वनपरिक्षेत्रात गेल्याची माहिती शनिवारी रात्री ३.३० वाजताच्या सुमारास वनविभागाला प्राप्त झाली असल्याची माहिती समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता. पण दोनच दिवसांत मध्यरात्री तो हत्ती पुन्हा परत आला. शहराजवळील हरडे कृषी महाविद्यालय परिसरातील लाल डोंगरी झुडपी जंगलात हत्ती असल्याची माहिती चामोर्शी वनपथकाला माहिती मिळाली. पथक हत्तीच्या पाळतीवर होते. त्याला तेथून हुसकून लावले असता तो सरळ चामोर्शी – गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर शहरालगत असलेल्या श्रीकांत ओल्लालवार यांच्या पेट्रोल पंप समोरील शाहरुख पठाण यांच्या पोल्ट्री फार्म जवळील शंकर बोदलकर यांच्या शेतात गेला. त्याने शेतातील घराची नासधूस केली. त्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या हत्तीला तेथून पिटाळून लावले असता पोहार नदी पार करून रात्री दोन वाजता त्याने खोर्दा गावातून हिवरगाव येथे प्रवेश केला. तेथून त्याला पिटाळून लावण्यात यश आले असून तो हत्ती कुनघाडा क्षेत्रातील भाडभिडी मो. जंगल परिसरात गेला असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. चामोर्शी वनपरिक्षेत्रधिकारी आर. बी. इनवते यांच्या मार्गदर्शनात भाडभिडी क्षेत्रसहायक व्ही. एस. चांदेकर, चामोर्शी क्षेत्र सहायक सलीम कुरेशी, तर जामगिरी क्षेत्रसहायक भारत राठोडसह वन पथक व कुनघाडा वनपरिक्षेत्र अधिकारी मधुमती तावाडे यांचेही पथक हत्तीच्या पाळतीवर आहे. दरम्यान शेतीचे व घराचे हत्तीने नुकसान केले आहे. त्याची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी शंकर बोदलकर यांनी केली आहे. सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती चामोर्शी वनपरिक्षेत्रातील विविध गावांतील जंगल परिसरात वास्तव्यास होता. तो चामोर्शी वनपरीक्षेत्रातून कुनघाडा वनपरीक्षेत्रात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन घोट,चामोर्शी, कुंनघाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.
#गडचिरोली
#चामोर्शी
#हत्तीचा_हैदोस
#वनविभाग
#महाराष्ट्र
#रानटीहत्ती
#शेतीचे_नुकसान
#वन्यजीव
#हत्ती
#निसर्ग_संकट
#सतर्कतेचा_इशारा
#वन्यजीवसंरक्षण
#ForestNews
#ChamorshiNews
#TuskerTerror
#WildElephant
#HumanWildlifeConflict
#TrendingN
ow
#BreakingNews









