Home Gadchiroli मंत्री बाहेर पडताच शिवसेनेत गोंधळ!

मंत्री बाहेर पडताच शिवसेनेत गोंधळ!

97

गडचिरोली, ता. ७ : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादाजी भुसे यांनी शुक्रवार (ता. ७) शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते विश्रामगृहातून बाहेर जाताच पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख आणि त्यांचे समर्थक आपसांत भिडले. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीपासून राकेश बेलसरे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यानंतर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपनेते व शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नव्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरूवात केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप ठाकूर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पक्षात अंतर्गत कलह वाढत गेला. त्यानंतर ठाकूर यांच्याकडे गडचिरोली विभागाची, तर राकेश बेलसरे यांच्याकडे अहेरी विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. अशातच गुरुवारी शिक्षणमंत्री दादाजी भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते सर्किट हाऊसमध्ये गेले. तेथे त्यांनी पाच मिनिटे थांबून शिवसेना पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर ते चंद्रपूरला जाण्यास निघाले. भुसेंनी सर्किट हाऊस सोडताच संदीप ठाकूर व राकेश बेलसरे यांच्यात हमरीतुमरी झाली. समर्थकही एकमेकांवर भिडले आणि राडा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना वाद मारहाणीपर्यंत पोहचल्याने सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या अंतर्गत वादाचे पर्यवसान नेमके कशात होईल, पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय उपाययोजना करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

#गडचिरोली #शिवसेना #दादाजीभुसे #राजकीयवादळ #अंतर्गतकलह #ShivSenaClash