भरधाव अवजड ट्रकने पुलाचे कठडे तोडले, पाच तास वाहतूक ठप्प

113

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. ११ : अवजड साहित्य घेऊन जाणारा एक ट्रक आष्टी ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अनियंत्रित झाल्याने अनखोडा पुलाचे कठडे तोडून अर्धवट स्थितीत लटकला. ही घटना शनिवार (ता. ९) घडली असून ट्रक रस्त्यातच आडवा लटकल्याने पाच तास वाहतूक बंद होती. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला.

शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक हा भरधाव ट्रक पुलाला धडकला आणि तिथेच लटकून राहिला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक मुख्य मार्गावरच लटकून असल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल ५ तास ठप्प होती. त्यामुळे रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी वाहतूक ठप्प झाल्याने ये-जा करण्याऱ्या प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. आष्टी येथून गडचिरोलीच्या दिशेने अवजड साहित्य घेऊन हा ट्रक निघाला होता. दरम्यान, अनखोडा गावालगत असलेल्या नदीच्या पुलावर वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाचे लोखंडी कठडे तोडून अर्धवट स्थितीत अडकून राहिला. ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून स्वतःची सुटका करून घेतली. मुख्य मार्गावरच ट्रक अडकून असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, ट्रकमधील लोखंडी साहित्य दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आले. त्यानंतर ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अखेर ५ तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सायंकाळी ५.३० वाजता ट्रक रस्त्यावरून हटविण्यात आला. यादरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ऐनरक्षबंधनाच्या दिवशी ठप्प होती. रक्षाबंधनाचा सण साजरा करायला अनेक बहिणी आपल्या भावाच्या घरी निघाल्या होत्या, तर काही बहिणी भावाला राखी बांधून माहेराहून सासरी परतत होत्या. मात्र ट्रक अडकून पडल्याने वाहतून ठप्प होऊन सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागला.

————————————–