स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांत पोहोचली लालपरी

142

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : जनसुरक्षेसह जनसेवा करत असलेल्या गडचिरोली पोलिस दलाच्या अथक प्रयत्नांमुळे सोमवार (ता. १८) देशाच्या स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर प्रथमच अतिदुर्गम आंबेझरी गावासह १५ गावांत लालपरी अर्थात राज्य परीवहन महामंडळाची बस पोहोचली आहे.

विशेष म्हणजे याचवर्षी २६ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली ते कटेझरी अशी बससेवा गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आली होती. याचप्रमाणे जिल्हा पोलिस मुख्यालयापासून १०० किमी आणि कटेझरी येथून २१ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम आंबेझरी येथील नागरिकांना बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत बसचे स्वागत केले. यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात कटेझरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी या बस सेवेचे उद्घाटन केले. तसेच हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरूमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा मार्गावर सुरू झालेल्या या बससेवेमुळे या भागातील १५ हुन अधिक गावांमधील नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवनमान सुसह्य होणार आहे. बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. या मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल. सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मूलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण ५०७ मोचाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली असून एकूण ४२० किमी लांबीच्या रस्त्याचे आणि ६० पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षभरातच गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.) गर्देवाडा, वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकनार ते अहेरी रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलिस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात कटेझरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले व इतर अधिकारी आणि अंमलदारांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलिस दलाच्या या जनसेवेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून कटेझरीसह १५ गावांतील ग्रामस्थांनी पोलिस दलाचे आभार मानले आहे.

—————————————–