ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १४ : ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने शनिवार (ता.१३) अटक केली. शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय ३२ वर्षे, रा. परायनार, ता. भामरागड, जि. गडचिरोली, असे अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचे नाव आहे.
शंकर महाकाचा खूनासह जाळपोळ व भुसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होते. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर जाहीर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासावर असणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातदेखील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता. गडचिरोली जिल्हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी देशविघातक कृत्ये करत असतात. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. शनिवारी भामरागड उपविभागाअंतर्गत ताडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तिरकामेटा जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना या जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी प्राणहिता पोलिस उप-मुख्यालयात आणले असता तोो जहाल माओवादी शंकर महाका असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला असल्याची माहिती मिळाली. २१ जानेवारी २०२२ रोजी धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीत धोडराज ते इरपनार मार्गे पेनगुंडा रत्स्याच्या कामावर असलेल्या एकूण २ कोटी रुपये किंमतीच्या १९ वाहनांची माओवाद्यांनी जाळपोळ केल्याच्या घटनेवरून लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर १ जाळपोळ, १ खून व इतर २ असे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवानांनी पार पाडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पुन्हा एकदा माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून शरणागती पत्करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. सन २०१६ पासून सन २०२१-२२ पर्यंत शंकर महाकाने माओवादी संघटनेमध्ये जनमिलीशीया पदावर काम केले. सन २०२१-२२ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. सन-२०२२ पासून आजपर्यंत परायनार व आसपासच्या जंगल परीसरात राहून दलमकरिता पोलिसांची माहिती मिळविण्याचे काम करत होता. तसेच वेळोवेळी गरज पडल्यास दलमसोबत राहून विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी होत होता. सन २०२२ मध्ये मौजा धोडराज ते ईरपनार मार्गे पेनगुंडा रस्त्यावर माओवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटनेत त्याचा सहभाग होता. सन-२०२३ मध्ये पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच इतर २ गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता.
————————-










