ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १ : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ नोव्हेंबर, २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ (Form 18) भरून अर्ज करण्याचे आवाहन पदवीधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाची सुरुवात ३० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याने झाली आहे. मतदार नोंदणीसाठी नमुना १८ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ६ नोव्हेंबर, २०२५ आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. याच दिवसापासून दावे व हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल, ज्याची अंतिम मुदत १० डिसेंबर, २०२५ आहे.
दावे व हरकतींवर २५ डिसेंबर २०२५ पर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर, २०२५ रोजी होणार आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पदवी परीक्षा अर्हता दिनांकाच्या (१ नोव्हेंबर २०२५) तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी. तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर/प्रसिद्ध केल्याचा दिनांक गृहीत धरला जाईल, दीक्षांत समारंभाची तारीख नाही.मतदाराचे नागपूर पदवीधर मतदार संघात सर्वसाधारण रहिवास असावा आणि तो भारताचा नागरिक असावा.जरी तुमचे नाव सन २०२० च्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी, २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.पदवीधर मतदारसंघाकरिता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना १८ मध्ये अर्ज दाखल करायचा आहे.नमुना १८ चा दावा/अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे करता येईल.पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना १८ आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो. मात्र गठ्ठा पद्धतीने (मोठ्या संख्येने) नमुना १८ अर्ज वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे, BLA द्वारे अथवा राजकीय पक्ष यांना सादर करता/स्वीकृत केला जाणार नाही. तथापि, विभाग प्रमुख त्यांच्या अधिनस्थ पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांचे नमुना १८ चे दावे एकत्रित सादर करू शकतात. तसेच, कुटुंबातील व्यक्ती त्याच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो, परंतु यासाठी दोघांचा रहिवास पत्तासारखा असणे अनिवार्य आहे. या अर्जासोबत विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी (Degree) किंवा सरकारी दप्तरी पदवीबाबतची नोंद किंवा विद्यापीठाने पदवीधारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड किंवा पदवीच्या अंतिम वर्ष उत्तीर्ण केलेली मूळ गुणपत्रिका यापैकी कोणतेही एक कागदपत्र अनिवार्य आहे. नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीकरिता विभागीय आयुक्त, नागपूर हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली व उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना-१८ अर्ज आवश्यक पुराव्यांसह ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
——————————————–










