ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शुक्रवार (ता. ७) सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवैध दारू, चारचाकी वाहनासह ८, ६९, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काही व्यक्ती आलापल्ली येथे चारचाकी वाहन क्र. एम एच २० ई जे ५२७२ ने अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहेत, अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सावरकर चौक, आलापल्ली येथे सापळा रचला. संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसून आल्यावर पोलिसांनी वाहनास रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यानंतर चालकाला त्याचे नाव विचारले असता त्यानेआपले नाव पंकज अशोक शर्मा, रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर असे सांगितले. त्यानंतर पोलिस पथकाने पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता वाहनात ९० एमएल मापाचे संत्रा देशी दारूचे ३१ बॉक्स एकूण किंमत २ लाख ४८ हजार रुपये, दोन लिटर क्षमतेचे व्हिस्कीचे ७ बॉक्स किंमत १ लाख ४७ हजार रुपये, ५०० मिली मापाचे बियरचे १४ बॉक्स किंमत १ लाख ८००रुपये, दोन लिटर क्षमतेच्या व्हिस्कीच्या २ पेट्या, एकूण १२ बॅरल किंमत ४२ हजार रुपये, ५०० मिली मापाचे बियरचे ३ बॉक्स किंमत २१ हजार ६००रुपये असा देशी व विदेशी दारुचा अवैध मुद्देमाल मिळला. दारू वाहतूक करिता वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ३ लाख रुपये मोबाईलची किंमत १० हजार रुपये असा एकूण ८ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाबाबत वाहन चालक पंकज शर्माकडे अधिक विचारपूस केली असता, तो स्वत: व सुलतान शेख दोघेही रा. चंद्रपूर जि. चंद्रपूर यांनी मिळून हा मुद्देमाल किशोर डांगरे व पप्पी झोरे, दोघेही रा. आलापल्ली, जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरून आलापल्ली येथे आणला, असे त्याने सांगितले. यावरून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने अहेरी पोलिस स्टेशन येथे पंकज अशोक शर्मा, किशोर डांगरे, पप्पी झोरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी चालक पंकज अशोक शर्मा याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पंकज शर्मा याला न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्न्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र पटले करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, चालक पोलिस शिपाई दीपक लोणारे यांनी पार पाडली.
————————————————










