Home Gadchiroli घरामागच्या सांदवाडीत त्याने उगवला कोट्यवधींचा गांजा…पोलिसांनी काय केलं ?वाचा नक्की

घरामागच्या सांदवाडीत त्याने उगवला कोट्यवधींचा गांजा…पोलिसांनी काय केलं ?वाचा नक्की

97

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी शुक्रवार (ता. १४) कुरखेडा उपविभागाअंतर्गत मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये हु­र्यालदंड येथे कारवाई करत तब्बल १ कोटी १९ लाख ८३ हजार रुपयांचा अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला.

प्राप्त माहितीनुसार हु­र्यालदंड येथे राहणारा कृष्णा हरसिंग बोगा याने त्याच्या राहते घराच्या सांदवाडीत अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. अशा माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक हु­र्यालदंड येथे रवाना झाले. गोपनीय माहितीमध्ये संशयीत कृष्णा हरसिंग बोगा ( वय ४१)रा. हु­र्यालदंड, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याच्या घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलिस पथकाने त्याच्या घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली. त्याच्या घराच्या सांदवाडीत अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केलेली आढळून आली.या ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, घराच्या सांदवाडीत लागवड केलेला गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा २३९. ६६ कि.ग्रॅ वजन असलेला एकुण १ कोटी १९ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घराच्या सांदवाडीमध्ये गांजा उगवला असल्याने आरोपी कृष्णा हरसिंग बोगा याच्याविरुद्ध पुराडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल अंमली पदार्थ जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मालेवाडाचे पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक आकाश नायकवाडी करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौंड, पोलिस अंमलदार रोहीत गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, गणेश वाकडोतपवार, संतोष नादरगे, नितेश सारवे यांनी पार पाडली.

—————————————–