भाजप उमेदवारांना नवी उभारी: मुख्यमंत्र्यांची सभा आणि अंकिता लोखंडेचा रोड शो गाजला

260

मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला ‘गेटवे ऑफ साउथ इंडिया’ बनवणार

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ३० : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार गडचिरोली जिल्ह्याचा प्रचंड वेगाने विकास करत आहे. आजपर्यंत सर्वांत मागे व मागास राहिलेल्या या जिल्ह्याला आता आम्ही स्टिल हब सोबतच ‘गेटवे ऑफ साउथ इंडिया’ बनवणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सध्या नगर परीषद निवडणुकांची धूम असून गडचिरोली येथील प्रचार सभेत शनिवार (ता. २९) मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी चिमूरचे आमदार तथा भाजपचे गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी,माजी आमदार कृष्णा गजबे, सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, समन्वयक प्रमोद पिपरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), आरमोरीचे उमेदवार रूपेश पुणेकर, देसाईगंजच्या उमेदवार लता सुंदरकर यांचीही उपस्थिती होती. पुढे विचार व्यक्त करताना मुख्यमत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत ८०० कोटींपेक्षा अधिक निधीचा वापर करण्यात आला आहे. गडचिरोली शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या १३० कोटींच्या नळयोजनेला वेग दिला जाईल. शहराला बायपास (आऊटर रिंग रोड) ची गरज असून त्या कामाला लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालय सर्व सुविधांनी सुसज्ज होत असून जिल्ह्यात इतरही विकासकामे वेगाने पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नसून “लखपती दीदी” योजनेतून लाडक्या बहिणींना अधिक अर्थसमृद्ध केले जाईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्याला दक्षिण भारताशी जोडणारा नवा आर्थिक महामार्ग निर्माण करणार आहोत. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील. गडचिरोलीचा विकास ही फक्त घोषणा नाही, तर आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. अॅड. प्रणोती निंबोरकरसह रूपेश पुणेकर, लता सुंदरकर हे सारेच उमेदवार विकासाच्या ध्येयानेच कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

*अभिनेत्री अंकिता लोखंडेंच्या रोड शो*

 

गडचिरोली नगर परीषदेसह इतरही नगर परीषदांचा गड सर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रविवार (ता. ३०) अभिनेत्री अंकिता लोखंडे (पवित्र रिश्ता फेम )यांच्या रोड शोचे आयोजन केले.

गडचिरोली नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराला भाजपने प्रचंड ताकद लावली आहे. हा रोड शो भाजप कार्यालयपासून गांधी चौक, सराफा लाइन बाजार रोड, हनुमान मंदिर, तेली मोहल्ला, वंजारी मोहल्ला, धानोरा मेन रोड, कॅम्प एरिया, रामनगर, रेड्डी गोडाऊन चौक ते चामोर्शी रोडवरील भाजप कार्यालयापर्यंत रोड शोला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड-शो पार पडला. यावेळी भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, निवडणूक प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, डॉ. भारत खटी, ज्येष्ठ नेते सुधाकर येंगदलवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या रोड शोमुळे भाजपच्या प्रचाराला बळ मिळाले आहे.