ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २ : जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परीषदांच्या निवडणुकांसाठी मंगळवार (ता. २) नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदान पार पडले. नागरिकांनी मतदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला असून दुपारी ३. ३० वाजेपर्यंत तिन्ही नगर परीषद मिळून एकूण ५४. ८१ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात तिनही नगर परीषदा मिळून नगराध्यक्ष पदासाठी एकूण २६, तर नगरसेवक पदाकरिता ३५२ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली नगर परीषदेत अध्यक्ष पदासाठी ८ व सदस्य पदासाठी १३४ उमेदवार उभे आहेत. देसाईगंज नगर परीषदेमध्ये अध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी ११० उमेदवार आणि आरमोरी नगर परीषदेत अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक १० उमेदवार असून नगर सेवक पदासाठी १०८ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज (वडसा) या तीनही ठिकाणी एकूण १०५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. मतदानासाठी सकाळी फार गर्दी नसली तरी दुपारी १२ वाजतापासून गर्दी वाढू लागली. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दोन ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला.
महत्त्वाच्या उमेदवारांकडे जनतेची नजर…
मतदान पार पडले. पण निकाल लांबणीवर गेला असून २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे तिनही नगर परीषदांतील महत्त्वाच्या उमेदवारांच्या निकालाकडे जनतेची नजर लागली आहे. गडचिरोली नगर परीषदेत कविता पोरेड्डीवार (काॅंग्रेस), प्रणोती निंबोरकर (भाजप), अश्वीनी नैताम (राष्ट्रवादी काॅंग्रेस- शिंदेसेना), बिपाशा भुसारे (राष्ट्रवादी काॅंग्रेस- मनसे-शिवसेना), वनिता बांबोळे (परीवर्तन आघाडी), देसाईगंज नगर परीषदेत नीता गुरू (राष्ट्रवादी काॅंग्रेस – अजित पवार) , वनिता नाकतोडे (काॅंग्रेस), लता सुंदरकर (भाजप), आरमोरी नगर परीषदेत वेणू ढवगाये (शिवसेना उबाठा), प्रशांत सोमकुमर (काॅंग्रेस), रूपेश पुणेकर (भाजप), राहुल गराडे (शिवसेना शिंदे), जयकुमार मेश्राम ( राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार) हे नगराध्यक्ष पदाचे महत्त्वाचे उमेदवार आहेत.
—————————-










