ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १७ : नियतीने शरीर पंगू केले तरी मनात जिद्द असेल तर व्यक्ती कोणतेही अलौकिक कार्य करून शकते. हेच गोंडवाना विद्यापीठाची खेळाडू श्वेता कोवे हिने सिद्ध केले आहे. श्वेता कोवेने दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये ‘पॅरा आर्चरी’ या क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
श्वेता कोवे ही गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्वेता कोवे हिने उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासोबतच तिने मिश्र प्रकारात कांस्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. ग्रामीण व आदिवासीबहुल आष्टी येथील खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, यामुळे महात्मा फुले महाविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. श्वेताला डॉ. श्याम कोरडे यांनी प्रशिक्षण दिले. या कामगिरीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. श्वेता कोवे हिचे बालपण अतिशय संघर्षात गेले. दहावीत शिक्षण घेत असतानाच वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली. आर्थिक अडचणी, अपंगत्व आणि समाजातील नकारात्मक दृष्टीकोन यांचा सामना करत तिने शिक्षण सुरू ठेवले. प्राथमिक शिक्षण कढोली येथील जिल्हा परीषद शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंत, तर पुढील शिक्षण महात्मा फुले विद्यालय, आष्टी येथे झाले. लहानपणापासूनच नेमबाजीची आवड असल्याने शाळेत गन शुटिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने आर्चरी या खेळावर आपले लक्ष केंद्रित केले. “हा खेळ मुलींचा नाही”, या शब्दांना न जुमानता श्वेताने सराव सुरूच ठेवला. शाळा आणि स्थानिक नागरिकांच्या आर्थिक मदतीतून तिला खेळाचे साहित्य उपलब्ध झाले. बुलढाणा येथे दीड वर्षे कठोर प्रशिक्षण घेत असताना ती नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिली. दिल्ली येथे झालेल्या पॅरा इंटरनॅशनल ट्रायलमध्ये दुसरा क्रमांक, तर हरियानामध्येही दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सातत्याने सराव करत अखेर तिने दुबईतील स्पर्धेत मोठे यश मिळवत जिल्ह्याचे व देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये येनापूर परिसरात स्थापन झालेल्या ‘दिव्यांग व्यक्तीची शक्ती’ या दिव्यांग संघटनेची श्वेता सक्रिय सदस्य आहे. “दिव्यांग असलो तरी जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही,” असा सकारात्मक संदेश देत ती इतर दिव्यांगांना प्रेरणा देत असते. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल विदर्भ दिव्यांग संघटना, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था (गडचिरोली) तसेच चंद्रपूर, भंडारा व गोंदिया येथील विविध दिव्यांग संघटनांकडून तिच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
————————————-










