गडचिरोली, ता. २० : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक आणि सांघिक कांस्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी गडचिरोली जिल्ह्यातील सुवर्णकन्या श्वेता भास्कर कोवे हिचा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शुक्रवार (ता. १९) तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. तसेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत तिच्या पुढील प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याची घोषणा केली.
दिव्यांगत्वावर मात करत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या श्वेताची यशोगाथा केवळ गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एका छोट्याशा गावातून जागतिक स्तरापर्यंत पोहोचण्याचा तिचा संघर्ष, जिद्द आणि मेहनत आज नव्या पिढीसमोर आदर्श ठरत आहे. या ऐतिहासिक यशानंतरही श्वेताचा प्रवास इथेच थांबू नये, तर तिने भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे, या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. श्वेताच्या पुढील उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी आणि तयारीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आपण वैयक्तिकरीत्या उचलणार असल्याची त्यांनी जाहीर घोषणा केली. आर्थिक अडचणी कधीही तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नयेत, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक जबाबदार समाजघटक म्हणून आपण श्वेताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील अशा हिऱ्यांना योग्य संधी आणि पाठबळ मिळाले, तर ते जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्वेताच्या जिद्दीला आणि तिच्या पालकांच्या संघर्षाला सलाम करत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तिच्या भविष्यातील जागतिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, नरेश अलसावार, नीरज रामानुजनवार, विनोद भोयर, कुसनराम, भारत खडेसर, सरपंच जितेंद्र हुलके, सलील इजमनकर, मोरेश्वर चरडे, शरद अलगमकार, प्राचार्य संजय फुलझेले, किशोर पाचभाई, सुशील अवसरमोल, रामदास हुलके, गोविंदा धानोरकर, बबलू टेमरे, दीपक मोहुर्ले, माजी सरपंच बेबीताई बुरांडे, राजनाथ ऊसवाजी आणि येमडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
———————————————-










