ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली , ता.१० : गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात, भगवान बिरसा मुंडा नगरीत आजपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५४ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सोलंकी, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत पर्बत, प्रांत मंत्री श्री. देवाशीष गोतरकर, स्वागत समिती अध्यक्ष आमदार श्री. मिलिंद नरोटे, स्वागत समिती सचिव श्री. गोविंद सारडा, अभाविपचे ,गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा. सुनीता साळवे तसेच मंत्री संकेत म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात बोलताना उद्घाटक अशोक उईके म्हणाले की, विद्यार्थ्यांप्रती आपुलकी ठेवून त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तत्परतेने धावून येणारे अभाविपचे कार्यकर्ते खरोखरच कौतुकास्पद कार्य करत आहेत. विद्यार्थी शक्ती हीच देशबांधणीची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
मुख्य अतिथी म्हणून बोलताना अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सोलंकी यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात विद्यार्थी शक्तीचा मोठा वाटा राहिला आहे. मंगल पांडे, भगत सिंह यांसारख्या अनेक युवकांनी देशासाठी बलिदान दिले असून आजची युवा पिढीही राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी स्वागत समिती सचिव श्री. गोविंद सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थी, शिक्षक व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हे अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.










