ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. १५ :
गडचिरोली नगरपालिकेत युवा नेतृत्वाची नवी ऊर्जा पाहायला मिळत असून, भाजपाच्या पूर्ण पाठिंब्याने निखिल चरडे यांची नगर परिषद उपाध्यक्षपदी निर्विरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपालिकेच्या कारभारात तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपाध्यक्ष निखिल चरडे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सागर निबोंरकर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी निखिल चरडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. युवक नेतृत्वाच्या माध्यमातून शहरातील विकास, स्वच्छता, सामाजिक उपक्रम तसेच जनकल्याणकारी योजनांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, शहरातील युवकांमध्ये नेतृत्वाची आवड निर्माण होणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जाणे ही या निवडीची सकारात्मक बाजू असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. नगरपालिकेतील नव्या टीमकडून पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी प्रशासन अपेक्षित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नगरपालिकेत युवा नेतृत्वाचे संतुलन साधल्यामुळे आगामी काळात गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी अधिक बळकट झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.










