पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या बळाने लोकशाही मजबूत करावी आमदार विजय वडेट्टीवार; प्रेस क्लबच्या वतीने अझीझ नाथानी यांना गडचिरोली गौरव पुरस्कार.

121

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आहे. पत्रकारांनी देशाच्या स्वातंत्र्यातही मोठे योगदान दिले आहे. देश व समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असलेल्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या बळाने लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन काॅंग्रेसचे विधी मंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

गडचिरोली प्रेस क्लबतर्फे मंगळवार (ता. ६) स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन व गडचिरोली गौरव पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे होते. विशेष पाहुणे म्हणून सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, नागपुरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुमार मैत्र, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला. प्रारंभी मारोतराव इचोडकर यांनी दमदार आवाजात महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अझीझ हमीद नाथानी यांचा गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पुढे मार्गदर्शन करताना काॅंग्रेसचे विधी मंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना कार्य करताना अनेकदा विरोधाचा, रोषाचा सामना करावा लागतो. बदलत्या काळात पत्रकारीचे क्षेत्र बदलत असून पत्रकारांच्या विविध समस्यांची दखल घेणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे अझीझ उर्फ (बंटी) नाथानी यांची गडचिरोली गौरव पुरस्कारासाठी निवड करून गडचिरोली प्रेस क्लबने योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल आनंद होत आहे. अझीझ नाथानीसारखे अनेक बहुमोल हिरे गडचिरोलीत आहेत जे कुठलाही गाजावाजा न करता समाज व देशासाठी झटत राहतात. गडचिरोली प्रेस क्लबने अशाच पात्र व्यक्ती शोधून त्यांचा सन्मान करावा असेही ते म्हणाले. सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी पोरेड्डीवार परीवार व नाथानी परीवाराच्या पारीवारिक जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा देत अल्पसंख्यांक समाजातील पण जिल्ह्यासाठी मोठे कार्य करत असलेल्या अझीझ नाथानी यांना पुरस्काराने सन्मानित केल्याचा सर्वार्थाने आनंद झाल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक समाजघटक एकमेकांशी जुळलेला आहे. हे स्नेहबंध सुदृढ करण्याचे कार्य प्रेस क्लबच्या वतीने होत असल्याचेही ते म्हणाले. आपल्या सत्काराला उत्तर देताना अझीझ नाथानी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे प्रेम, जिव्हाळा व पालकांच्या आशीर्वादामुळेच आपण देश, जिल्हा, समाजासाठी कार्य करू शकत असल्याचे म्हटले. तसेच हा पुरस्कार आपण प्रत्येक पावलावर खंबीर साथ देणारे वडील हमीद नाथानी यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. या भावनिक क्षणी मान्यवरांच्या हस्ते त्यांचे वडील हमीद नाथानी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आमदार रामदास मसराम यांनी प्रेस क्लबच्या सोहळ्याचे कौतुक करत जिल्ह्यातील पत्रकार समाजातील सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रीत करून सन्मान करतात हे प्रेरणादायक असल्याचे म्हटले. नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देत असून आपणही गडचिरोली शहराच्या विकासात पत्रकारांची मदत घेणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुमार मैत्र यांनी आपल्या दीर्घ पत्रकारीतेच्या आठवणी सांगताना पत्रकारांच्या समस्यांचाही उहापोह केला. तसेच पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लब अध्यक्ष मिलिंद उमरे यांनी केले. सत्कारमूर्तींच्या परीचयाचे वाचन सचिव शेमदेव चाफले यांनी केले. संचालन प्रा. संध्या येलेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रूपराज वाकोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे सचिव शेमदेव चाफले, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सहसचिव नंदकिशोर काथवटे,सदस्य सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश नगराळे, विलास दशमुखे, मनोज ताजने, निलेश पटले, सहयोगी सदस्य विनोद बदखल, गणेश शिंगाडे, इरफान शेख, आशीष अग्रवाल, मनीष रक्षमवार, ओमप्रकाश चुनारकर, संदीप कांबळे, नंदकिशोर पोटे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गडचिरोलीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान….

प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त गीतगायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.