आरमोरीजवळ भरधाव ट्रॅव्हल्सची एसटी बसला धडक; ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी

194

ग्लोबल गडचिरोली न्यूज

आरमोरी, ता. १९ :

आरमोरी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या चुरमुरा गावानंतर आरमोरीच्या दिशेने असलेल्या पहिल्या वळणाजवळ सोमवारी (ता. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तब्बल २० प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी एसटी बसचे चालक शत्रुघ्न लहानुजी मगरे (वय ५०) यांनी आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एमएच-१४ एलएक्स-५९२६ क्रमांकाची एसटी बस गडचिरोली येथून आरमोरी, कासवी, फरी, वडसा मार्गे प्रवासी घेऊन जात होती. चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर आरमोरीच्या दिशेने असलेल्या पहिल्या वळणाजवळ समोरून येणारे ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करीत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी चालकाने बसचा वेग कमी करत ब्रेक लावून बस डाव्या बाजूला घेतली.

याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक एमएच-३४ एबी-८३२० च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेप्रकरणी आरमोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चलाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.