गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ बुधवारी होणार

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, ता. १९ : गोंडवाना विद्यापीठाचा १३वा दीक्षांत समारंभ बुधवार (ता. २१) सकाळी ११.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोमवार (ता. १९) पत्रकार परीषदेत देण्यात आली.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे राहतील. प्रमुख प्राहुणे म्हणून सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग हे दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच या समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या समारंभामध्ये अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परीषदेचे सदस्य,दानदाते आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या समारंभात विशेष गुणवत्ता प्राप्त, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात मानव विज्ञान विद्याशाखा ४३, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा ३४, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा १५, आंतरविद्याशाखीय विद्याशाखा ४ अशा एकूण ९६ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी वितरित करण्यात येणार आहे.

वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतून सर्वाधिक सुवर्णपदके मिळवणारी विद्यार्थिनी नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूरची वैष्णवी संजय थेरकर हिने तीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड विज्ञान कॉलेज, नागभीड चंद्रपूरची जादा रबिया रियाज हिे तीन अशी सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. मानव विज्ञान विद्याशाखा २३, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा ८, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा ५,

आंतरविद्याशाखीय विद्याशाखा ३ या दीक्षांत समारंभात एकूण ३९ विद्यार्थ्यांना सुवर्ण व एक रजत अशी एकूण ४० पदके प्रदान केली जाणार आहेत. तसेच स्पार्क (SPARC)अभ्यासक्रमाच्या (Social Programme on Addiction in Rural Community ) विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.

या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परीषदेत करण्यात आले. या पत्रकार परीषदेला कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची उपस्थिती होती.