गडचिरोलीत पाच दिवसांच्या कोया कृषी कुंभाचे आयोजन ..

96

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

मुख्य संपादक , तिलोत्तमा समर हाजरा

 

गडचिरोली, ता. ३ : “अस्मिता आदिवासींची, समृद्धी शेतीची – गडचिरोलीची नवी क्रांती” या बिरीदवाक्याखाली कोया कृषी कुंभ २०२६ चे भव्य आयोजन ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरळकर यांनी सोमवार (ता. २) पत्रकार परीषदेत या भव्य आयोजनासंदर्भात दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, हा उपक्रम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी समाज, कृषी उद्योजक व युवकांसाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरणार आहे. या कृषी कुंभाचे उद्घाटन गुरुवार (ता. ५) दुपारी १२ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. उद्घाटन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार अॅड. अभिजीत वंजारी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, आमदार सुधाकर अडबाले, आमदार रामदास मसराम, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचीही उपस्थिती राहणार आहे. कोया कृषी कुंभ २०२६ हा केवळ प्रदर्शन नसून शेतीला उद्योगाशी जोडणारा, आदिवासी अस्मितेला बळ देणारा आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा उपक्रम ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी पंडा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिरळकर यांनी सांगितले. या कृषी कुंभात भव्य कृषी प्रदर्शन, शेतमाल विक्री मेळावा, खरेदीदार–विक्रेता संमेलन, परिचर्चा व परिसंवाद, शासनाच्या विविध योजनांची माहिती, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन, असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कृषी कुंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध बल्लवाचार्य (शेफ) विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली १हजार १११ किलोग्रॅमचा नाचणी शिरा तयार करून विश्वविक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पद्मश्री पोपटराव पवार, बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, भारतातील कृषी पर्यटन संकल्पनेचे प्रणेते पांडुरंग तावेरे, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा आदी मान्यवरांची मधमाशी पालन, मत्स्य पालन, पशुसंवर्धन, कृषी पर्यटन, शेतकरी उत्पादक कंपन्या, बांबू लागवड, वनौषधी, रानभाज्या, दुग्धव्यवसाय आदी विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या कृषी कुंभाशी कोया हा विशेष शब्द जोडलेला आहे. हा शब्द आदिवासी अस्मितेशी निगडीत आहे. आदिवासींच्या अनेक जमाती असल्या तरी सगळे आदिवासी स्वत:ला कोय किंवा कोयतूर म्हणवून घेतात. कोया शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील एक अर्थ कूस किंवा आईची कुस असाही आहे. आपण पृथ्वीमातेच्या कुशीतून सर्वप्रथम जन्माला आलो म्हणून आम्ही मूळ निवासी अर्थात कोया किंवा कोयतूर आहोत, असे आदिवासी बांधव म्हणतात. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे प्रतिक म्हणून हा शब्द या कृषी कुंभासाठी वापरण्यात आला आहे.

—————————————-