अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी वॉरियर्स अव्वल. सिंहगड लायन्सचा पराभव, सिझन–८ यशस्वीरित्या संपन्न.

70

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता .२ : गडचिरोली शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळील स्व. ना. सा. गंगूवार मैदानावर अप्पर-डिप्पर ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या सिझन–८ मध्ये शिवनेरी वॉरियर्स संघाने उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. रविवार, १ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम लढतीत शिवनेरी वॉरियर्सने सिंहगड लायन्स संघाचा पराभव केला, तर सिंहगड लायन्सला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.

२४ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा सलग आठ दिवस चालली. स्पर्धेत शिवनेरी वॉरियर्स, सिंहगड लायन्स, रायगड रॉयल्स आणि प्रतापगड पँथर्स असे एकूण चार संघ सहभागी झाले होते. लीग सामन्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या शिवनेरी वॉरियर्स संघाने प्रतापगड पँथर्सवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य सामन्यात रायगड रॉयल्सचा पराभव करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सिंहगड लायन्स संघाने लीग टप्प्यातच सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.

अंतिम सामना अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरला. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उज्जैर शेख यांनी लगावलेला शानदार षटकार निर्णायक ठरला आणि शिवनेरी वॉरियर्स संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मैदानावर उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींनी जल्लोष करत विजयी संघाचे अभिनंदन केले.

स्पर्धेचा समारोप सोहळा बोदली येथील समशेर खान पठाण यांच्या एनएस सेलेब्रेशन सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमनानी, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समशेर पठाण, सर्जन डॉ. यशवंत दुर्गे, अनुराग पिपरे, निखिल मंडलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना ट्रॉफी व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या यशस्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी अप्पर-डिप्पर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांसह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच खेळाडू, पंच, स्वयंसेवक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार मानले. ————————————