“स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गडचिरोलीचा संकल्प : पोटेगाव रोडवरील अस्वच्छतेवर कठोर पावले”

205

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली , ता ०३ : गडचिरोली शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी ठाम भूमिका घेत नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी ‘स्वच्छतेचा आक्रमक अजेंडा’ राबविण्यास सुरुवात केली आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत, केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता कठोर अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

याच अनुषंगाने गडचिरोली शहरालगतच्या पोटेगाव रोड परिसरात निर्माण झालेल्या गंभीर अस्वच्छतेच्या प्रश्नावर नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी थेट आणि आक्रमक हस्तक्षेप केला.

या परिसरात नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातून संकलित करण्यात आलेला कचरा उघड्यावर टाकण्यात येत होता. परिणामी संपूर्ण भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. हवेमार्गे पसरत असलेली दुर्गंधी व घाण आजूबाजूच्या वस्तीपर्यंत पोहोचत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

विशेष बाब म्हणजे, याच रस्त्यावरून पोलीस भरतीसाठी सराव करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच सकाळी मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात. अशा सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले होते.

या प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी वेळ न दवडता घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थिती पाहून त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की,

“माझ्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तात्काळ कचरा उचलणे, संपूर्ण परिसर निर्जंतुक करणे तसेच भविष्यात उघड्यावर कचरा टाकला जाणार नाही यासाठी कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेतही यावेळी देण्यात आले.

या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी पिंदुरकर, जे. ई. खामनकर तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या थेट हस्तक्षेपानंतर तत्काळ स्वच्छता मोहिमेला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या ठाम, आक्रमक आणि नागरिककेंद्रित भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून,

“गडचिरोली आता केवळ स्वच्छतेच्या घोषणा करणारे शहर न राहता प्रत्यक्ष कठोर अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.