ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड राज्याच्या सीमेवर फोदेवाडा गावापासून काही अंतरावर कारवाई करत माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. यादरम्यान पोलिस – माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पुरुष माओवादी ठार झाला असून पोलिसांच्या सी- ६० पथकाचा एक जवानसुद्धा जखमी झाला आहे.
मंगळवार (ता. ३) संध्याकाळी माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य आणि छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलममधील सदस्यांबाबत पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात त्याच रात्री १४ सी ६० पथकांसह फोदेवाडा गावाच्या काही किलोमीटर अंतरावर, नारायणपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. बुधवार (ता. ४) माओवाद्यांशी काही काळ झालेल्या चकमकीदरम्यान माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्रतिकूल भूभाग आणि घनदाट जंगलामुळे माओवाद्यांचा शोध लागू शकला नाही.गुरुवार (ता. ५) सकाळी राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान, अतिरिक्त ४ सी ६० पथक आणि सीआरपीएफ क्यूएटीचे १ पथक अभियानाकरिता पाठवण्यात आले आहे. सकाळपासून माओवाद्यांशी अधूनमधून चकमक सुरू असून आतापर्यंत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह व त्यासोबत १ एके-४७ आणि १ एसएलआर रायफल अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याच्या शक्यतेची पडताळणी सुरू आहे. मृत पुरुष माओवाद्याची ओळख अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. गुरुवारी संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी ६० पथकाचा एक जवान एक गोळी लागून जखमी झाला असून त्याला पुढील उपचाराकरिता बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून शोधमोहीम संपल्यानंतर गडचिरोली पोलिस दलाकडून पुढील माहिती देण्यात येईल, अशी माहिती गडचिरोली पोलिस विभागाने दिली आहे.
————————————–










