ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १४ : पोलीस दल भरती (२०२४-२५) अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी आजपासून अत्यंत सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने सुरू झाली आहे. संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध, निष्पक्ष आणि तांत्रिक अचूकतेसह पार पडत असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

पहिल्या दिवशी १,५०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी १,३११ उमेदवार उपस्थित राहिले असून उपस्थितांपैकी १,२१७ उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी उंची व छाती मोजण्यासाठी PST मशीन, धावण्याच्या चाचण्यांसाठी RFID तंत्रज्ञान आणि गोळाफेक मोजमापासाठी प्रिझम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

या आधुनिक साधनांमुळे वेळेची अचूक नोंद, मानवी हस्तक्षेपात घट आणि प्रक्रियेवरील विश्वास वाढत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उमेदवारांकडूनही या तंत्रज्ञानाधारित व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उ
उमेदवारांना आवाहन :
पोलिस अधीक्षक निलोतपल यांनी सर्व उमेदवारांना प्रामाणिकपणे, नियमांचे पालन करून आणि कोणत्याही गैरप्रकारांना बळी न पडता चाचण्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. “भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मेहनत आणि गुणवत्ता हाच निवडीचा एकमेव निकष आहे,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रशासनाने ही भरती प्रक्रिया गुणवत्तापूर्ण, निष्पक्ष आणि आदर्श पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.










