गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्र्यांसमोर जिल्हा शल्यचिकित्सकांना नगराध्यक्षांचा थेट सवाल

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी २०२६ : लांझेडा येथील मंदाताई विजय एैडलावार यांच्या १८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात उपचारात झालेल्या कथित हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यासंदर्भात नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्यचिकित्सकांना थेट जाब विचारला.

ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित महिलेला वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली आणि अखेरीस त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आरोग्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना आयोजित बैठकीत नगराध्यक्षांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. “जर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले असते, तर एक जीव वाचू शकला असता का?” असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. उपस्थित आरोग्य विभागातील अधिकारी व नागरिकांसमोर त्यांनी उपचार व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी केंद्र आहे. येथे कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, उपचारात विलंब किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता सहन केली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात, अशीही त्यांनी मागणी केली. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, जबाबदार आणि पारदर्शक व्हावी, हीच जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.