आंध्र प्रदेशातील बिग भारत लीग सीझन २ क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर लॉयड्स मेटल्सच्या संघाची मोहर

109

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : लॉयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेडच्या क्रिकेट संघाने आंध्र प्रदेशातील प्रमुख कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या बिग भारत लीग (BBL) सीझन २ मध्ये शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावत आपली अजिंक्य मोहर उमटवली आहे.

ही स्पर्धा १४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळ करत संघाने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली आणि दोन लाख रुपयांची रोख पारितोषिक रक्कम प्राप्त केली. या स्पर्धेत शासन, कॉर्पोरेट, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. यात लाॅयड्स मेटल्सव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा बाईकर्स स्टुडीओ युनियन हिटर्स, रेल्वेचा एलाईट रेल स्ट्राईकर्स,, विनस्मिथ्स स्टेट डायनामाईट, आयुष्मान व्हाईट कोट वाॅरीयर्स, फाॅर्च्युन कार्पोरेट किंग्स, फिजर मेड मार्व्हल्स आणि एक्सेन्ट्रिक पाॅवर टायकून्स या संघांचा समावेश होता. कर्णधार विजय कोडापे यांच्या नेतृत्वाखाली लाॅयड्स मेटल्सच्या संघाने उत्कृष्ट संघभावना आणि सर्वांगीण खेळाच्या जोरावर नॉकआउट फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत झालेल्या चुरशीच्या सामन्यात लाॅयड्स मेटल्स संघाने फाॅर्च्युन काॅर्पोरेट किंग्स संघावर तीन विकेट्सने रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. ग्रँड फायनलमध्ये लाॅयड्स मेटल्सचा सामना एक्सेन्ट्रिक पाॅवर टायकून्सशी झाला. लाॅयड्स मेटल्नने प्रथम फलंदाजी करत १७४ धावांचे स्पर्धात्मक लक्ष्य उभे केले. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला ११६ धावांवर रोखले आणि ५८ धावांनी शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात नंदा कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत ४७ धावा केल्या आणि एक विकेट घेतली. त्यांच्या उत्कृष्ट सर्वांगीण कामगिरीसाठी त्यांना मॅन ऑफ द फायनल पुरस्कार देण्यात आला. उपदेश राजपुत यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून गौरविण्यात आले, तर कर्णधार विजय कोडापे यांना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. याप्रसंगी लाॅयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि कंपनीत कार्यरत इतर खेळाडूंनाही त्यांच्या आवडत्या खेळाबद्दलची आवड जपण्याचे आवाहन केले. कंपनीकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हा विजय लाॅयड्स मेटल्ससाठी अभिमानाचा क्षण असून स्थानिक युवा प्रतिभांना खेळात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असेही ते म्हणाले.

————————————–