सशक्तीकरणाचा उत्सव : जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषद गडचिरोलीत भव्य महिला मेळावा

332

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ९ :    ८ मार्च रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषद गडचिरोलीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नगर भवन येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिला व बालकल्याण सभापती सौ. सीमा राहुल कन्नमवार यांच्या नियोजनातून पार पडलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सीमा राहुल कन्नमवार होत्या, तर सहअध्यक्ष म्हणून सौ. शिल्पा उद्धव गव्हारे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षाताई लहाडे, डॉ. चंदा कोडवते तसेच कायदेविषयक सल्लागार अॅड. मोनिका निंबेकर यांची उपस्थिती लाभली.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये महिला पत्रकार तिलोत्तमा हाजरा, ई-रिक्षा चालक वैशाली डोंगरे, गायत्री मांढरे, महिला उद्योजिका उमा बन्सोड व सपना बोरेवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या महिलांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज व्यक्त केली. महिलांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “महिला सशक्त झाल्या तर समाज आणि देश दोन्ही प्रगती करतात,” असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी डॉ. वर्षाताई लहाडे व डॉ. चंदा कोडवते यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार व व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अॅड. मोनिका निंबेकर यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत सविस्तर माहिती देत अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठविण्याचे आवाहन केले.

महिला व बालकल्याण सभापती सौ. सीमा कन्नमवार आणि उपसभापती सौ. शिल्पा गव्हारे यांनी महिलांमध्ये परस्पर मैत्री, एकोपा आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी नगरपरिषद गडचिरोलीतर्फे ‘समूहातून समृद्धीकडे’ या योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा तसेच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली.

यावेळी नगरपरिषद गडचिरोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका तसेच शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सन्मान, सशक्तीकरण आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी, ठाकरे सर, नाईक सर तसेच नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य लाभले.