जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

119

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ११ : गडचिरोली जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा किंवा इतर कोणत्याही कारणाचा आधार घेत कृत्रिम तुटवडा असल्याचे भासवणे, अफवा पसरवणे किंवा सिलेंडरचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या जिल्ह्यातील वितरकांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गोकुल, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे तसेच हिंदुस्तान पेट्रोलियमचे जिल्हा मुख्य वितरक आकाश गौर यांच्यासह संबंधित वितरक उपस्थित होते.

बैठकीत वितरकांकडून जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. सध्या व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरवर काही निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवांसाठी प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सर्व गॅस वितरकांनी संबंधित कंपनीशी समन्वय ठेवून गॅस पुरवठा सुरळीत ठेवावा. तसेच कोणत्याही चुकीच्या संदेशांमुळे किंवा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही अनावश्यक घाबरून जाणे किंवा साठेबाजी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीदरम्यान संबंधित कंपन्यांनी दररोजचा उपलब्ध गॅस साठा जिल्हा पुरवठा कार्यालयास कळवावा, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी गॅस एजन्सींनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात टोल-फ्री क्रमांकासह माहिती फलक लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

नागरिकांनी त्यांच्या अडचणी व तक्रारी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या ०७१३२-२२२००७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.