पोइला बोइशाख हा बंगाली नववर्षाचा सण पश्चिम बंगालसह देशातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नसून, तो सांस्कृतिक ओळख, धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक आधार यांचा सुंदर संगम मानला जातो. मराठी नववर्ष चैत्र मासापासून, तर बंगाली नववर्ष वैशाख मास अर्थात बोईशाख महिन्यापासून प्रारंभ होतं. यातूनच मराठी-बंगाली संस्कृतीत किती जवळचा नातेसंबंध आहे, हे लक्षात येतं. सौर कॅलेंडरनुसार सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करताच नववर्षाची सुरुवात होते, ज्याला मेष संक्रांती असं म्हटलं जातं. हिंदू खगोलशास्त्रानुसार सूर्याच्या या संक्रमणामुळे नवीन कालचक्राची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार हा काळ सृष्टीच्या नव्या चक्राचा प्रारंभ दर्शवतो. सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव यांनी याच काळात विश्वनिर्मितीची सुरुवात केली, असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो.

यामुळे पोइला बोइशाख हा सण पुनर्जन्म, नवचैतन्य आणि सर्जनशीलतेचं प्रतीक मानला जातो. या दिवशी लोकं घरांची स्वच्छता करून नवीन वर्षाचं स्वागत करतात. मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतात. विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करून सुख-समृद्धीची कामना करतात. पोइला बोइशाखच्या दिवशी व्यापारी वर्गात “हाल खाता” ही विशेष परंपरा पाळली जाते. नवीन हिशेब पुस्तिका (खाते) सुरू केली जाते. किती गंमत आहे बघा. आपल्या महाराष्ट्रात दिवाळीत लक्ष्मीपूजनापासून अनेक व्यापारी, व्यावसायिक नव्या वहीखात्याची सुरूवात करतात. “हाल खाता” परंपरेनुसार ग्राहकांना निमंत्रण पत्रिका पाठवली जाते. ग्राहक दुकानात येऊन जुनी उधारी चुकवतात. व्यावसायिकांकडून ग्राहकांना मिठाईचे डबे व नवीन कॅलेंडर भेट दिले जाते. या दिवसापासून नवीन आर्थिक व्यवहारांना सुरुवात होते.

ही परंपरा विश्वास, संबंध आणि आर्थिक शिस्त यांचं प्रतीक मानली जाते. पोइला बोइशाख हा सण सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. पारंपरिक वेशभूषा (महिला लाल-पांढरी साडी, तर पुरुष धोतर-कुर्ता परीधान करतात.) लोकनृत्य, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. पारंपरिक खाद्यपदार्थ आणि मिठाईचं वितरण होतं. विशेषतः पांता भात याला या दिवशी विशेष महत्त्व आहे. या सणाचं प्रमुख आकर्षण म्हणजे मंगल शोभायात्रा. ही भव्य मिरवणूक पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. विविध रंगीबेरंगी मुखवटे, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे हा सोहळा अत्यंत आकर्षक ठरतो.

आजच्या आधुनिक काळातही पोइला बोइशाख सांस्कृतिक ओळख जपण्याचं माध्यम आहे. हा सण समाजात एकता आणि बंधुभाव वाढवतो, नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा देतो, व्यापार आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करतो…एकूणच हा सण म्हणजे नवीन आशा, नवीन संधी आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. सर्वांनाच पोइला बोइशाख नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

#पोइला_बोइशाख #PoilaBoishakh #BengaliNewYear #नववर्ष #BengaliCulture #IndianFestivals #मेषसंक्रांती #वैशाख #नवचैतन्य #NewBeginnings #TraditionAndCulture #CulturalHeritage #भारतीयसंस्कृती #FestivalVibes #HappyPoilaBoishakh #SubhoNoboBorsho #BanglaCulture #UnityInDiversity #सांस्कृतिकवारसा #IndianTradition
——————————-










