Home Gadchiroli तरुणीवर केली बळजोरी, दहा वर्षाची तुरुंगवारी

तरुणीवर केली बळजोरी, दहा वर्षाची तुरुंगवारी

162
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज
  • गडचिरोली, ता. १७ : सायकलने महाविद्यालयात जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत दोन नराधमांनी तिला नेऊन बलात्कार केला. वासनेचे पुजारी असलेल्या या दोघांनाही आज १७ मे २०२४ रोजी न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रशांत उमाजी जोगे (वय ३२), रवींद्र सुमराज मडावी ( वय २५) दोघेही रा. तळेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे असून आता दहा वर्षे त्यांना तुरुंगाची वारी घडली आहे.
  • प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी ३ मार्च २०१३ रोजी बेलगाव (स्वगाव) वरून सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे कुरखेडा येथील महाविद्यालयाकडे सायकलने जात असताना बेलगाव ते नवरगाव रोडवर आरोपी प्रशांत जोगे, रवींद्र मडावी यांनी तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवुन सायकलवरून खाली पाडले. तोंडावर रुमाल बांधून तिला उचलून दुचाकी वाहनावर बसवले. त्यानंतर बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्त्याने घेऊन गेले. जंगल भागात दुपारी १२ ते १२. ३० वाजताच्या सुमारास तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापन केले. दोघांनीही आळीपाळीने बलात्कार केल्यानंतरही त्यांची विकृती थांबली नाही. त्या असहाय्य तरुणीला त्यांनी हाताबुक्याने जबर मारहाण केली. कुणाला माहिती दिली तर तुझ्या आई-वडीलांना ठार मारू, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होते. दोन्ही आरोपी मारहाण करत तिचे कपडे फाडत असताना पीडीता त्यांच्या तावडीतून सुटून रस्त्यावर आली. एका अनोळखी मुलीच्या साहाय्याने घरी पोहचून पालकांना सगळी हकिगत सांगितली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिस स्टेशन येथे ७ मार्च २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ८ मार्च २०१८ रोजी आरोपींना अटक करण्यात आली. वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून शुक्रवार (ता. १७) आरोपी प्रशांत जोगे, रवींद्र मडावी,यांना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी दहा वर्षे सश्रम कारावास व २ लाख ७४ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर, पोलिस उपनिरीक्षक विजय वनकर यांनी केला.