नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

652

गडचिरोली, ता. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मागील १० वर्षांचा काळ हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अद्याप बाकी आहे. त्याचा पुढील कार्यकाळ या देशाला विकसित देश करणारा ठरेल. म्हणून त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले.

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार अशोकनेते यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार २६ मार्च रोजी दाखल केल्यानंतर आयोजित विजय संकल्प सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ.देवराव होळी, माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, लोकसभा प्रमुख किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. पुढच्या दहा वर्षांत देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही यंदा ‘चारशे पार’चा नारा दिला आहे. ही संख्या पार करण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य रेषेच्या वर आणले. ज्या देशात गरिबी आणि बेरोजगारी नसेल असा विकसित भारत मोदींना निर्माण करायचा आहे. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर जिल्हा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५५ वर्षे काँग्रेसचे आणि १० वर्षे मोदींचे अशी तुलना केल्यास मोदींची सत्ता देशाला विकसित भारताकडे घेऊन जाणारी ठरली आहे. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, पीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे अशोक नेते यांना बहुमतांनी विजयी करून नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.