मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची भव्य स्कुटी रैली

148

गडचिरोली, ता. ११ : मराठी नववर्षदिन गुढीपाडव्यानिमित्त येथील आधार विश्व फाउंडेशन व नारीशक्तीच्या संयुक्त विद्यमाने मराठमोळ्या वेशातील महिलांनी स्कुटी रॅली काढत हा सण उत्साहात साजरा केला.

हिंदू संस्कृतीने विश्वाला आनंदी जीवन जगायला शिकवणारी जीवन पद्धत घालून दिली आहे. त्यामुळे अशा महान संस्कृतीने ठरवून दिलेल्या वर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करून नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात व्हावी या उद्देशाने २०१७ पासून आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात गुढीपाडव्याला मराठमोळ्या वेशभूषेत महिलांची स्कुटी रॅली काढण्यास सुरुवात केली. यावर्षीसुद्धा आधारविश्व फाउंडेशन व नारीशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संस्कृतीची माहिती व ओळख नवीन पिढीला करून द्यावी याच विचाराने प्रेरित होऊन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नऊवारी पातळ, नथ, फेट्यासह अस्सल मराठी वेशभूषेत सोमवार (ता. ८) सायंकाळी ५ वाजता महिला स्कुटी रॅली काढण्यात आली. रॅलीला गडचिरोली जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा यांनी हिरवी झेंडी दाखवली. कोणतेही शास्त्र किंवा इतिहास नसताना केवळ पाश्चात्यांचे अंधानुकरण करून ३१ डिसेंबर या दिवशी बरेच लोक नवीन वर्ष साजरे करतात, आपल्या उज्ज्वल संस्कृतीला विसरून सोज्वळ स्वरूपाचे हिंदू सण विसरून कर्णकर्कश आवाज करणारे डीजे लावून दारूच्या व मटणाच्या पार्ट्या करतात, हे योग्य नाही, असे सांगण्यात आले. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपली संस्कृती लोप पावत असून येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे. त्यामुळे समाजमनात हिंदू संस्कृतीचे महत्त्व रुजणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले. गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज होऊया, असा संकल्प करण्यात आला. रॅलीमध्ये गीता हिंगे, माणिक ढोले,उज्ज्वला वालोदे,सुनीता साळवे, डॉ चंदा कोडवते, वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार, सुनिता आलेवार, माधुरी दहिकर,अनघा भुसारी, भारती तारगे,प्रणाली मुनघाटे,प्रतिमा सोनवणे,संगीता राऊत,स्मिता खटी,स्मिता भांडेकर,शिल्पा हेमके,अलका माटेटवार, दिपाली काथोटे,तिलोत्तमा हाजरा, रंजना भांडेकर संगीता वरगंटीवार, निर्मला कोट्टावार, लक्ष्मी कलंत्री तसेच गडचिरोलीच्या बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

———————————————